मातंग समाजाचे प्रेत अडवून जातीयवादी वक्तव्य केल्याने माळेवाडी(बो) येथील तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल
मातंग समाजाचे प्रेत अडवून जातीयवादी वक्तव्य केल्याने माळेवाडी(बो) येथील तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल
बोरगांव(वृत्तसेवा): माळेवाडी(बो) येथील मातंग समाजाचे धनाजी आनंता साठे यांचे निधन झाल्यावर त्यांचे कुटुंबिय व इतर लोक त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीकडे निघाले होते. त्याचवेळी रविंद्र शहाजीराव पाटील, गजेंद्र भिमराव पांढरे, चंद्रकांत मारूती पांढरे, संभाजी नाथाजी कुदळे, जयराम मच्छिंद्र कुदळे, भगवान बाबुराव कुदळे, रामचंद्र मच्छिंद्र पांढरे, राहुल शिवाजी कुदळे, विनायक शिवाजी कुदळे, प्रविण मधुकर कुदळे, सुभाष सदाशिव पांढरे, संदीप भगवान कुदळे व अमोल दत्तात्रय कुदळे यांनी मांगाचे प्रेत आम्ही आमच्या रस्त्याने अंत्यविधीसाठी जाऊ देणार नाही असे म्हणून मातंग समाजाच्या भावना दुखावल्याने व मयत प्रेताची विटंबना केल्याने या तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी फिर्यादी विमल सुरेश साठे यांची जाऊ राणी दशरथ साठे व दशरथ आनंता साठे यांनी गावातील विनायक शिवाजी कुदळे, राहुल शिवाजी कुदळे, नवनाथ विष्णू पांढरे व विजया शिवाजी कुदळे यांचेविरूध्द अकलूज पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल झाले असून त्या गुन्ह्याच्या कारणावरून साठे व कुदळे यांच्यात वाद आहे. त्यामुळेच फिर्यादीचे दीर धनाजी आनंता साठे हे मयत झाल्यानंतर त्यांच्या मयताची हेळसांड करून सदरच्या जातीयवाद्यांनी जातीयवादी वक्तव्य केले आहे. धनाजी आनंता साठे हे मयत झाल्यावर त्यांचा अंत्यविधी करण्याकरिता सरपणाची आवश्यकता असल्याने फिर्यादीचा मुलगा मिथुन व इतर लोक बोरगांव येथील राजू माळी यांच्या लाकडाच्या अड्ड्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी अड्ड्यामध्ये सरपण नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी खंडाळी येथून टेम्पोमध्ये सरपण आणले. यादरम्यान सदरच्या टेम्पोच्या पाठीमागे धनाजी आनंता साठे यांचे प्रेत घेऊन त्यांचे नातेवाईक माळेवाडी (बो) येथील स्मशानभूमीकडे जात असताना वरील तेरा जातीयवाद्यांनी पूर्वीच्या तक्रारीचा राग मनात धरून “तुम्ही आमच्याविरूध्द दिलेली तक्रार माघारी घेतो असे लेखी लिहून द्या, नाहीतर तुमचा टेम्पो व प्रेत या रस्त्याने जाऊ देणार नाही, मांगाचे मयत आमच्या शेतातील रस्त्याने स्मशानभूमीकडे न्यायचे नाही. तसेच जर तुम्ही ऍट्रोसिटीची तक्रार माघारी घेतली नाही तर तुम्ही प्रेत ओढ्यात नेऊन अंत्यविधी करा” असे वक्तव्य केले. त्यावेळी नातेवाईकांनी सदरची स्मशानभूमी ही गावातील नागरिकांसाठी असल्याने तुम्ही आम्हाला आमच्या मयत इसमाच्या अंत्यविधीसाठी का अडविता? अशी विचारणा केली असता सदरचा रस्ता आमच्या शेतातील असल्याने आम्ही तुम्हाला या रस्त्याने जाऊ देणार नाही असे हे जातीयवादी म्हणाले. इतकेच नव्हे तर मयताचे प्रेत त्या रस्त्याने घेऊन जाता येऊ नये म्हणून या जातीयवाद्यांनी रस्त्यावर पाणी सोडले. त्यामुळे फिर्यादी विमल सुरेश साठे या दीराचे प्रेत लाकडाच्या टेम्पोमध्ये ठेवून आपल्या नातेवाईकांसह पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास गेल्या. तेव्हा संबंधित तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टनुसार ३(१)(एस), ३(१)(झेड ए), ३४१, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. सदरचे गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रेताचे दहन उपस्थित पोलिसांच्या साक्षीने माळेवाडी (बो) ग्रामपंचायतसमोर करून अंत्यसंस्कारास आडकाठी आणणाऱ्या या जातीयवादी प्रवृत्तीचा निषेध केल्याने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे